राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जितु परदेशी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे यांचा सत्कार
पैठण, (प्रतिनिधी): नगर परिषदेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्वीकृत नगरसेवकपदाची संधी देण्याचा शब्द खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी दिला होता. हा शब्द त्यांनी प्रत्यक्षात पाळत राष्ट्रवादीला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.
दिलेला शब्द पाळणारे आणि मित्रपक्षाला सन्मान देणारे नेतृत्व भुमरे यांच्या रूपाने पाहायला मिळाले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक जितु परदेशी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परदेशी बोलत होते. नगर परिषद निवडणुकीपूर्वी मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेत स्वीकृत सदस्याची संधी देण्याचा शब्द भुमरे यांनी दिला होता. राजकारणात आश्वासने देणे सोपे असते. मात्र दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे असते. भुमरे यांनी दिलेला शब्द पाळून राष्ट्रवादी काँग्रेसला नगर परिषदेत प्रतिनिधित्वाची संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे परदेशी यांनी सांगितले.
यावेळी मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला योग्य सन्मान देत आगामी काळातही शहराच्या विकासासाठी दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी नगरसेवक बजरंग लिंबोरे, भाऊसाहेब तरमले, अप्पासाहेब निर्मळ, फाजलभाई टेकडी, शहादेव लोहारेसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














